Lockdown : जाणून घ्या, श्रीराम नवमी, महावीर जयंतीसंदर्भात मार्गदर्शक सूचना

मुंबई  – करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षी 21 एप्रिल रोजी येणारी श्रीरामनवमी आणि 25 एप्रिल रोजी येणारा महावीर जयंती उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने गृहविभागामार्फत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 

कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजाअर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. तसेच यावर्षी मंदिरात भजन, कीर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये. मंदिरामधील व्यवस्थापक, विश्वस्त यांनी शक्‍य असल्यास दर्शनाची ऑनलाइन सुविधा, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून द्यावी. श्रीरामनवमीच्या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी. मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

तसेच पूर्ण राज्यात महावीर जयंती उत्सव जैन बांधवांमार्फत मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. महावीर जयंती उत्सव लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपापल्या घरी महावीर जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
कोविड-19 च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण. वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.