सातारा – सातारा येथील सदरबाजार, गोडोली, विसावा नाका, रविवार पेठ, शनिवार पेठ, खण आळी, मोती चौक, प्रतापगंज पेठ, मंगळवार पेठ, आयटीआय रोड अशा ठिकठिकाणी वास्तव्य असलेल्या जैन समाजाने आज एकत्र येऊन 24 वे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त महामिरवणूक काढत जन्म कल्याण महोत्सव साजरा केला. या जन्म कल्याण महोत्सवात विविध कार्यक्रम पारंपरिक पध्दतीने पार पडले.
सकाळी साडे सात वाजता पोवई नाक्यावरील भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात डॉ. विजय शहा म्हसवडकर यांच्या हस्ते जैन ध्वजारोहण, सर्व जैन पंथीयांच्या अध्यक्षांच्या हस्ते रथपूजन झाल्यानंतर समरथमल जैन, श्वेतांबर जैन (मंदिर खण आळी), अजित मुथा, जैन स्थानक, विजय शहा (दिगंबर जैन मंदिर), प्रवीण देवी (पार्श्वनाथ जैन मंदिर मंगळवार पेठ) व सुभाष केसरीमल ओसवाल (आयटीआय जैन श्वेतांबर मंदिर) या सर्व अध्यक्ष-विश्वस्तांच्या नेतृत्वाखाली जैन समाजातील सर्व पंथीय सदस्यांच्या सहभागाने महामिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणूक पोवई नाका, पोलीस हेडक्वार्टर, मल्हारपेठ, शनिवारपेठ, मोती चौक मार्गे खणआळी ते श्वेतांबर मंदिरापर्यंत सुमारे तीन किलोमीटर अंतर पार करून विसावली.
या महामिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व सदस्यांना मास्क वाटप करण्यात आले. या मिरवणुकीचे अग्रभागी श्वेत अश्व, जैन ध्वज, भगवान महावीरांच्या प्रतिमेचा रथ सहभागी होता. यासह श्वेत वस्त्रधारी लाल फेटा बांधलेले जैन युवक, मध्यभागी चुंदडी पेहेरलेल्या लाल वस्त्रांकित जैन युवती व त्यानंतर रंगीबेरंगी वस्त्रातील महिला यांचे सहा हजाराहूंन अधिक जैन बंधू-भगिनींचा सहभाग होता. या मिरवणुकीत राजवाडी वस्त्रे धारण केलेल्या राजस्थानी वाद्य वृंदांचा, झांज पथकाचा, पंजाबी ढोल पथकाचा समावेश होता. चौका चौकात जैन महिलांच्या दांडिया नृत्याने व महिला लेझीम पथकाने रस्त्याच्या दोन्ही बाजूस उपस्थित असलेल्या असंख्य प्रेक्षकांची दाद मिळविली. या मिरवणुकीच्या मार्गावर उपस्थित असणाऱ्यांसाठी लाडूचे प्रसाद वाटप करण्यात आले.
आयटीआय रोडवरील जैन मंदिरात डॉ. उदिता शहा पुणे यांचे णमोकार मंत्र हीलिंग या विषयावर उत्साहवर्धक व्याख्यान झाले. तेथे झालेल्या रक्तदान शिबिरात 100 हून अधिक जैन बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. त्यानंतर सकल जैन संघाच्या सदस्यांनी स्वामीवात्सल्याचा लाभ घेतला. सायंकाळी चार वाजता जैन स्थानकामध्ये महाजपाचे आयोजन केले होते.