रेडा – गेल्या तीन महिन्यांपासून इंदापूर शहर करोनामुक्त ठेवण्यास प्रशासन यशस्वी झाले होते. मात्र, शहरातील 78 वर्षीय व्यक्तीस करोनाची लागण झाल्याचे शनिवारी (दि. 6) निष्पन्न झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही व्यक्तीस पुण्यात उपचारासाठी गेल्यावर करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने शहरात तिच्या संपर्कात आलेल्या 19 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
इंदापूर शहरातील ही व्यक्ती गेले दोन महिन्यांहून अधिक काळ सोलापूर येथे आपल्या लेकीकडे रहावयास होती. त्यांना इतर त्रास जाणवू लागल्याने दि. 31 मे रोजी ती इंदापूर शहरात आले होते. त्यानंतर सोमवारी (दि. 1) त्यांना त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे रुग्णवाहिकेने नेण्यात आले.
त्यावेळी पहिली चाचणी निगेटिव्ह आली तर (दि. 4) दुसरी चाचणी घेतल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दर्गा मस्जिद चौक, नेहरू चौक, टेंभुर्णी नाका असा संपूर्ण परिसर सील केला आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, तहसीलदार सोनाली मेटकरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, नगरसेवक पोपट शिंदे, स्वप्नील राऊत, सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे यांनी (दि. 6) सकाळी त्या भागात भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, बाधिताच्या संपर्कात आलेल्याच्या घरातील तिघे, रुग्णवाहिका चालक व रुग्णाचा पुतण्या, रुग्णाला रिक्षाने सोडणाऱ्या रिक्षा चालकासह संपर्कात आलेल्या एकूण 19 व्यक्तींना विलगीकरण करण्यात आले असून त्यांची स्वॅब घेण्यात येत आहेत.