सातारा -पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रास्तरावर सुमारे 86 वैद्यकीय मदत पथके सुसज्ज ठेवण्यात आली असून जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष एक जूनपासून कार्यरत झाले आहे. नैसर्गिक आपत्ती व पूर परिस्थितीबाबत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.
एकीकडे करोना विषाणूच्या उपाययोजना आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस करत आहेत. आता नैसर्गिक आपत्ती व पूर परिस्थिती उपाययोजनासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 72 प्राथमिक आरोग्य केंद्र, 400 उपकेंद्र, 17 आयुर्वेद दवाखाने यांच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात येत असल्याचे डॉ. आठल्ये यांनी सांगितले. दि. 1 जूनपासून जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 24 तास साथरोग नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे.
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राकडे एक वैद्यकीय मदत पथक याप्रमाणे जिल्ह्यात 72 व 11 तालुकास्तरावर प्रत्येकी 1 आणि जिल्हा स्तरावर 3 अशी वैद्यकीय मदत पथके सुसज्ज ठेवली जाणार आहेत. जिल्हास्तरावर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांची तीन मोबाइल पथके तयार केली असून सर्वच आरोग्य केंद्रावर पुरेसा औषध साठा उपलब्ध केला आहे. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी इमर्जन्सी औषध किट तयार ठेवण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दि. 1 ते 30 जूनअखेर सर्व गावांत, वाडी व वस्तीच्या ठिकाणी साथरोग जनजागरण अभियान व हिवताप जनजागरण मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व खातेप्रमुखांना क्लोरिन टेस्टर देण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये पाणी उद्भवातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने पाणी शुध्दीकरणाबाबत लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. गाव, वाडी वस्तीनिहाय सर्वत्र टीसीएल साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताच्या ठिकाणची पाहणी करून पाणी नमुने तपासणीसाठी देण्यात येणार असल्याचे डॉ. आठल्ये यांनी सांगितले.
जिल्ह्यातील संपर्क तुटणाऱ्या गावात स्वयंसेवक, आशा व संस्था यांची जबाबदारी निश्चित करण्यात येऊन त्यांच्याद्वारे प्राथमिक औषधोपचारासाठी औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना केल्या आहेत. नागरिकांनी सध्याची करोना परिस्थिती आणि पावसाळ्यात उदभवणाऱ्या साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनाचं पालन करुन सहकार्य करावे.
– डॉ. अनिरूध्द आठल्ये (जिल्हा आरोग्य अधिकारी)