उंब्रज -काही दिवसांपूर्वीच उंब्रजकरांनी करोनामुक्त झाल्याचा आनंद व्यक्त केला. मात्र, हा आनंद फारकाळ टिकला नाही. एक व्यक्ती करोनाबाधित आढळली असून त्यामाध्यमातून उंब्रजमध्ये पुन्हा करोनाचा शिरकाव झाला आहे. मुंबईवरुन आलेल्या 26 वर्षीय युवकाचे रिपोर्ट करोना पॉझिटीव्ह आले आहेत. या युवकाच्या नजिकच्या संपर्कात आलेल्या 29 जणांचे स्वॅब नेण्यात आल्यामुळे उंब्रजकरांची भिती आणखीनच वाढली आहे.
उंब्रजमध्ये करोनाचा रुग्ण सापडल्याचे कळताच वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार, डॉ. स्नेहा निकम, तलाठी संदीप काळे तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी धाव घेवून परिस्थितीची पाहणी केली. आरोग्य पथकाने या परिसरातील सर्व्हे करुन नागरिकांची तपासणी केली.
डॉ. संजय कुंभार यांनी युवकाच्या नजीकच्या संपर्कातील हायरिस्कमधील पंधरा जणांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन तर लो रिस्कमधील 14 जणांना होम क्वारंटाईन करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. प्रशासनाच्या वतीने हा परिसर मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने जंतूनाशक फवारणी करण्यात आली.
याबाबत वैद्यकीय डॉ. कुंभार म्हणाले, मागील पंधरा दिवसांपूर्वी उंब्रज करोनामुक्त झाले होते. परंतु, पाटील गल्लीतील 26 वर्षीय युवकाचे गुरुवारी रात्री करोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्याने येथे पुन्हा करोनाचा शिरकाव झाला आहे. सदरचा युवक 21 जून रोजी मुंबई प्रवास करुन उंब्रज येथे आला आहे. तापाची लक्षणे असल्याने 22 रोजी उंब्रज आरोग्य केंद्रातून त्यास औषधे देण्यात आली. परंतु, ताप कमी न आल्याने तपासणीसाठी कृष्णा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याठिकाणी सदर युवकाचे स्वॅब तपासणीसाठी नेण्यात आले. गुरुवारी रात्री तपासणी अहवाल प्राप्त झाला असून सदर युवकास करोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, सदर युवकासोबत मुंबई येथून कारमधून कुंटूबांतील एक पुरुष, एक महिला व दोन लहान मुले आली आहेत. पैकी एकजण पुन्हा मुंबईला परत गेला आहे. तसेच युवकाच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या 29 जणांना क्कारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राने युवकाच्या नजीकच्या संपर्कातील हायरिस्क मधील 15 जणांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले असून लो रिस्क मधील 14 जणांना होम क्वारंटाईन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. पंधरा दिवसापूर्वी उंब्रज करोना मुक्त झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांसह आरोग्य विभाग, पोलीस, प्रशासन यांना दिलासा मिळाला होता. परंतु पुन्हा नव्याने रुग्ण सापडल्याने उंब्रजकरांची धाकधूक पुन्हा एकदा वाढली आहे.