ढेबेवाडी -चाफळ ता. पाटण परिसरातील रामपेठ येथील मुख्य बाजार पेठेतील एका 27 वर्षीय युवकाचे रिपोर्ट करोना पॉझिटीव्ह आल्याने चाफळसह विभागातील लोकांची धास्ती वाढली आहे.
चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचीन कुराडे यांच्यासह पथकाने या परिसरात धाव घेवून उपाययोजनांना सुरुवात केली आहे. याबाबत डॉ. कुराडे यांनी सांगितले की, सदरचा युवक तीन ते चार दिवसात पुणे प्रवास करुन चाफळ येथे आला आहे. तापाची लक्षणे असल्याने चाफळ येथील आरोग्य केंद्रातून औषधे व इंजिक्शन देण्यात आली. परंतु, तापासह इतर लक्षणे आल्याने त्याला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्याठिकाणी सदर युवकाचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. गुरुवारी सायंकाळी तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सदर युवकास करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, सदर युवक कुटूंबासह इतर लोकांच्या संपर्कात आला आहे. तसेच त्याच्या कुटूंबाचा भाजीचा व्यवसाय असल्याने नक्की किती लोकांच्या संपर्क आला आहे हे शोधण्याचे आव्हान आता प्रशासनापुढे आहे. सध्यस्थितीत या युवकाच्या हायरिक्स संपर्कातील 12 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. संपर्कातील दोघेजण पुणे येथे असल्याने त्यांना तिथेच क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच लो रिक्समधील चार जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
सदर ठिकाणी सर्कल व्ही. एन. सोनवणे, तलाठी एस. आर. देशमुख, ग्रामसेवक राजेंद्र चोरगे, सरपंच सूर्यकांत पाटील, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी भेट देऊ पाहणी केली. तसेच ग्रामस्थांना सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत सूचना केल्या.
चाफळ येथील करोना कमिटने व युवकांनी चाफळ गावात येणारे सर्व रस्ते बंद केले असून उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखीली चाफळ दूरक्षेत्राचे अमृत आळंदे, सुशांत शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच सहकार्याचे आवाहन केले आहे.