राजगुरूनगर -येथील नगरपरिषदेत अपहार केलेल्या सहापैकी 2 कर्मचाऱ्यांना उच्च न्यायायलाने तर एका कर्मचाऱ्याला राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. गणेश बाळकृष्ण देव्हरकर, महेश विष्णू घुमटकर, अमर अशोक मारणे अशी अंतरिम जामीन मंजूर केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
राजगुरूनगर नगर परिषदेत 31 मार्च 2018 ते 31 मार्च 2019 या काळात सुमारे 77 लाख रुपयांचा कर्मचाऱ्यांनी अपहार केला होता. या रकमेपैकी त्यांनी काही रक्कम नगर परिषदेच्या खात्यात जमा केली होती. त्यांच्याकडून 39 लाख 07 हजार 325 रुपये अपहराची रक्कम येणे असलेबाबत 30 मे रोजी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी युवराज विरणक यांनी खेड फिर्याद दिली होती. या फिर्यादीनुसार खेड पोलिसांनी अमर अशोक मारणे, सुनील सीताराम भालेराव, आशा पंडित पोखरकर, गणेश बाळकृष्ण देवरकर, महेश विष्णू घुमटकर, काळूराम संभाजी नाईकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
यापैकी गणेश देवरकर, आशा पोखरकर, महेश घुमटकर, काळूराम नाईकरे यांनी राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. राजगुरूनगर अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी या चौघांचा जामीन 19 जून रोजी फेटाळला होता. त्यानंतर गणेश बाळकृष्ण देवरकर, महेश विष्णू घुमटकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. दि. 23 जून 2020 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. गडकरी यांनी गणेश देव्हरकर, महेश घुमटकर याना अंतरिम जामीन मंजूर केला.
पुढची सुनावणी 31 जुलै रोजी होणार आहे. नगर परिषदेचे कर्मचारी अमर अशोक मारणे यांनी दि. 24 रोजी राजगुरूनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायाधीश ए एम अंबळकर यांनी अमर मारणे यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणी 2 जुलैला होणार आहे.
आरोपींची बाजू-
न्यायालयात या कर्मचाऱ्यांची बाजू ऍड. प्रशांत पाटील, ऍड. हेमंत बगाटे, ऍड. विनय काळे यांनी मांडली. आरोपींवरील कारवाई एकतर्फी असून या गुन्ह्यात नगर परिषदेचे शासकीय ऑडिट झाले नाही. ते होण्यापूर्वी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात जवळपास सर्वच आरोपींची अपहराची रक्कम जमा केली आहे. अशी बाजू ऍड. हेमंत बगाटे यांनी आरोपींच्या वतीने मांडली.