सोमाटणे – परंदवडी (ता. मावळ) येथे राहणाऱ्या एका 42 वर्षीय शिक्षिकेचा करोना चाचणीचा “रिपोर्ट पॉझिटिव्ह’ आला असल्याने परंदवडी गाव संपूर्ण सील करण्यात आले आहे. मावळ तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी करोनाचा नवा रुग्ण आढळून आला आहे.
यासंदर्भात आढले प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. दिलीप सूर्यवंशी यांनी सांगितले की, ही महिला शिक्षिका फक्त एकदा तळेगाव दाभाडे येथे भाजीपाला व अन्य खरेदीसाठी गेली होती. त्रास होऊ लागल्याने पुणे येथे डॉक्टर असलेल्या बहिणीच्या सल्ल्याने या महिलेची तपासणी करण्यात आली. तरी कोणाच्या संपर्कात आल्यामुळे तिला करोनाचा संसर्ग झाला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
ही शिक्षिका करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिच्या संपर्कातील घरातील दोन मुले, आई-वडील व ड्रायव्हर यांच्यासह सहा जणांना तळेगाव येथील सुगी पश्चात प्रशिक्षण संस्थेत क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. या शिक्षिका परंदवडी येथे राहत असून, बेबेड ओहोळ येथील जिल्हा परिषद शाळेत नोकरी करीत आहेत.
बाधित रुग्ण सापडल्याने संपूर्ण परंदवडी गाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून, सोमाटणे, धामणे व बेबड ओहोळ ही गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत, असा आदेश मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी काढला आहे.
गेल्या 22 दिवसांमध्ये मावळात शहरी भागात 5 व ग्रामीण भागात 10 अशा एकूण पंधरा जणांना पूर्ण संसर्ग झाला. त्यापैकी दोन रुग्ण पूर्ण मुक्त झाले आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 13 झाली आहे. मावळातील रुग्णांची संख्या दररोज वाढत चालल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. 27 मे पासून परत सलग नवीन तीन रुग्ण सापडल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.