शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मलठण फाटा परिसरात एकामागे एक असे तीन रुग्ण आढळून आले असताना शिक्रापूर येथे राहणारा एक बँक कर्मचारी दोन दिवसांपूर्वी बाधित झाल्याचे समोर आले होते. तर, आता पुन्हा शिक्रापूर येथील बाजार मैदानाजवळील एका सोसायटीमध्ये राहणारा एक कंपनी कामगार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले असून सात दिवसात पाच कोरोना रुग्ण आढळून आले असल्याने शिक्रापूर सह परिसर हादरून गेला आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील मलठण फाटा परिसरात राहणारे आणि रांजणगाव गणपती येथील नामांकित कंपनीत नोकरीला असणारे दोन कंपनी कंपनी कामगार तसेच एका कामगाराचा आठ वर्षाचा मुलगा कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते, तर दरम्यान हडपसर येथे एका बँकेत कामाला असणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली असताना दोन दिवस शिक्रापूरला काही प्रमाणात दिलासा मिळाला असताना आता पुन्हा नव्याने शिक्रापूर येथील बाजार मैदान परिसरातील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या आणि रांजणगाव येथील दुसऱ्या कंपनीत कामाला असलेल्या एका कामगाराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
सदर कामगाराला त्रास जाणवू लागल्याने तो २७ जून रोजी शिक्रापूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता, तेथील डॉक्टरांना त्याची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी त्याला पुण्यात उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला, त्यांनतर सदर कामगार पुणे येथे दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याची कोरोना तपासणी करण्यात आली असता त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शिक्रापूर येथील सदर कंपनी कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या विभागाचे आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचारी यांसह आदींनी सदर रुग्ण राहत असलेल्या सोसायटीचा सर्व परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने औषध फवारणी करत निर्जंतुकीकरण केला आहे.
सदर कंपनी कर्मचाऱ्याच्या संपर्कात असलेले त्याच्या पत्नी, आई व भाऊ गावाला गेले असून त्यांना देखील तपासणीसाठी नेण्यात येणार असल्याचे आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे यांनी सांगितले. कामगारासोबत कामाला जाणाऱ्या दोन इतर शेजाऱ्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्या कामगाराच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची माहित घेण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. तर काही दिवस कोरोना पासून मुक्ती मिळाल्याने शिक्रापूर व परिसरातील नागरिक समाधानी असताना आता पुन्हा एकामागून एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने शिक्रापूर सह परिसर हादरून गेला आहे.