सोरतापवाडी -आधीच करोनाच्या महामारीने त्रस्त झालेल्या जनतेला आता अहवालातील पॉझिटिव्ह, निगेटिव्हच्या गोंधळामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. अशीच घटना सोरतापवाडीत घडली असल्याने नेमका विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान, अशा घटना वारंवार उघडीस येत असल्याने पॉझिटिव्ह, निगेटिव्हच्या खेळात एकाद्याचा हाकनाक जीव जायचा, अशी भीती व्यक्त होत आहे.
सोरतापवाडी येथील एका 44 वर्षीय तरूणाला करोनाची लागण झाली आहे. मात्र, त्याची पहिली चाचणी निगेटिव्ह तर दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे सोरतापवाडीत एक करोनाबाधित असल्याची माहिती कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मेहबूब लकडे यांनी दिली.
सोरतापवाडी येथील एका व्यक्तीला सर्दी, ताप यासारखी लक्षणे जाणवू लागल्याने मंगळवारी (दि. 23 जून) लोणी काळभोर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याची करोनाची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी पहिली चाचणी निगेटिव्ह आली.
शुक्रवारी (दि. 26 जून) पुन्हा चाचणी घेऊन त्याच लॅबमध्ये पाठविले असता ही चाचणी पोझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना होमक्वारंटाइन करण्यात आले असल्याचे डॉ. लकडे यांनी सांगितले. सोरतापवाडी गावात करोनाचा रुग्ण आढळून आल्यामुळे ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सरपंच सुदर्शन चौधरी यांनी केले.