सातारा – खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मंगळवारी बऱ्याच दिवसानंतर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत भेट झाली. दोघांनीही एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीमध्ये झालेल्या आरोप- प्रत्यारोपानंतर झालेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सातारा नगरपालिकेतील लाचप्रकरणानंतर सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडी यांच्यात आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. या दरम्यान उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनी मात्र मौन बाळगले होते.
बऱ्याच दिवसात दोघांची भेट झाली नव्हती. मंगळवारी त्यांची जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत भेट झाली. दोघांमध्ये हास्यविनोद रंगला होता. दोन्ही राजेंमध्ये विचारविनिमय झाल्याने समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.