करोना उपचारांची बिले तपासणार : पालकमंत्री अजित पवार
भरमसाठ रक्कम उकळणाऱ्या रुग्णालयांना बसणार चाप
पुणे (प्रतिनिधी) – काही खासगी रुग्णालये करोना उपचारांची मोठ्या रकमेची बिले आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयांचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील,’ असे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर शासनाच्या नियमानुसार उपचारांची दर आकारणी केली आहे का, याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जावे, याबाबत संबंधित यंत्रणेने दक्षता घ्याव्यात,’ अशा सूचना पवार यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेत गतीने नियोजन करावे लागणार आहे. करोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजनांसाठी तसेच मंत्रालय स्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील,’ असे पवार म्हणाले. सुरुवातीस विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. बाधितांवर उपचार करण्यासाठीच्या सुविधा उभारणीबाबतचे प्रशासकीय पातळीवरील नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.