लंडन- कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णांच्या रक्तातील जनुकांचे विश्लेषण केल्यानंतर करोनाचा धोका विशिष्ठ रक्तगट असलेल्या व्यक्तींना तुलनेने अधिक असल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. संशोधकांनी युरोपात करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या रक्तांमधील जनुकांची तुलनात्मक पडताळणी केली. त्यामध्ये ए रक्त गट असलेल्या रुग्णांना करोनाचा गंभीर धोका असल्याचे आढळून आले आहे. तर ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना करोनाचा धोका तुलनेने कमी असल्याचे आढळले आहे.
मात्र इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संदर्भातील अहवालामध्ये करोनाचा धोका आणि रक्तगटांचा काहीही संबंध असल्याचे सिद्ध होत नाही. अशाच प्रकारचा दावा पूर्वी चीनमधूनही करण्यात आला आहे. मात्र त्याचेही समर्थन केले जाऊ शकलेले नाही, असे काही अभ्यासकांनी म्हटले आहे.
बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालाबाबत अभ्यासकांची वेगवेगळी मते आहे. विस्कोन्सिन येथील मेडिकल कॉलेजमधील ब्लड स्पेशालिस्ट डॉ. परमेश्वर हरी यांच्या मतानुसार नवीन अभ्यासानंतर आता यावर विश्वास ठेवावा लागतो आहे. मात्र अन्य संशोधकांनी त्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. रक्तगटाबाबतचा पुरावा फारच तात्पुरता आहे. या संदर्भातील संकेत स्पष्ट करण्यासाठी तो पुरेसा नाही, असे सॅन दिएगो येथील स्काईप्स रिसर्च ट्रान्सलेशनल इन्स्टिट्युटमधील प्रमुख डो. एरिक तोपोल यांनी म्हटले आहे.
इटली, स्पेन, डेन्मार्क, जर्मनी आणि इतर देशांतील शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या या अभ्यासात गंभीर कोविड -19 ची गंभीर बाधा झालेल्या सुमारे 2,000 रूग्णांची तुलना निरोगी, फक्त सौम्य लक्षणे असलेल्या किंवा काहीच लक्षणे नसलेल्या हजारो इतर लोकांशी केली गेली. त्यातील जनुकांच्या फरकाचे वर्गीकरण संशोधकांनी सहा गटात केले. त्यातूनच रक्तगटांचा आणि संसर्गाचा धोका कमी अधिक असण्याच्या शक्यता पुढे आल्या आहेत. अन्य संशोधकांनाही जनुकांचा व्यापक अभ्यास केल्यावर रक्तगटांचा आणि करोनाच्या संसर्गाचा काही संबंध आढळतो आहे का, हे आता बघायला लागणार आहे.