वॉशिंग्टन: करोना विषाणूने अमेरिकेवर केलेला हल्ला हा दुसऱ्या महायुद्धात जपानने पर्ल हार्बर बंदरावर केलेला हल्ला किंवा 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख चीनकडेच होता. चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या करोना विषाणूची बाधा अमेरिकेतील 12 लाख लोकांना झाली आहे आणि आतापर्यंत 73 हजारापेक्षा अधिक नागरिकांचा तिथे मृत्यू झाला आहे. असा हल्ला आतापर्यंत कधीही झाला नव्हता, असे ट्रम्प म्हणाले. कोविड-19 च्या विरोधात कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर आणि परिचारिकांबरोबरच्या वार्तालापादरम्यान ते बोलत होते.
सध्या ट्रम्प प्रशासन करोनाच्या फैलावाबद्दल चीनवर कारवाई करण्याची जोरदार मागणी करत आहे. करोना विषाणूची उत्पत्ती कोठून झाली, हे तपासण्यासाठी अमेरिकेचे तज्ञ चीनमध्ये जाऊ द्यावे, यासाठी चीनने परवानगी द्यावी यासाठी अमेरिकेकडून दबाव वाढवला जात आहे. नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षपदाची निवडणूक आहे.
चीनने मात्र आपल्यावरील आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. करोनाबाबतचा दोष अमेरिका चीनवर ढकलत असल्याचा आरोप चीनने केला आहे. अमेरिकेने चीनला दोष देणे थांबवावे आणि वस्तुस्थिती स्वीकारावी, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुन्यिंग यांनी म्हटले आहे. अमेरिकेने करोना विषाणूशी लढावे. चीनशी लढू नये, असेही त्या म्हणाल्या.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान पर्ल हार्बर या बंदरावर जपानने केलेल्या हल्ल्यामध्ये 2,400 नागरिक मरण पावले होते. तर 11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 2,977 जण मरण पावले होते.