सातारा (प्रतिनिधी): जिल्ह्यात आणखी एक तीन वर्षांच्या मुलाचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला असून जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता १८ झाली आहे. म्हाते खुर्द ( ता. जावळी) येथे सापडलेल्या करोनाबाधिताच्या कुटुंबातील हा मुलगा आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असलेल्या करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील ३ वर्षीय मुलाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हा मुलगा करोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
तसेच विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या करोनाबाधित रुग्णांचा १४ दिवसानंतरचा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला घशातील स्त्रावाचा नमुना पॉझिटिव्ह असल्याचे पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणखी पाच दिवस त्याच्यावर उपचार व पुनर्तपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. गडीकर यांनी दिली.
आता सातारा जिल्ह्यात १३ रुग्ण कोव्हिडबाधित असून आतापर्यंत तीन रुग्ण मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत. तर २ जणांचा मृत्यू झाला आहे.