मुंबई: मुंबईमध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणि मृतांमध्ये वाढ होत चालली आहे. अशात मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या वरळी येथे कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. वरळी येथे राहणाऱ्या एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाली आहे. तर, राज्यात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक ७४८ रुग्ण हे मुंबईतील आहेत.
वरळीमध्ये राहणाऱ्या एका ४७ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. हा डॉक्टर मुंबईतील सरकारी रुग्णालयात कार्यरत आहे. ७ एप्रिलला या डॉक्टरला श्वसनाला त्रास होत होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. आज आलेल्या तपासणी अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर सध्या कोरोना कक्षात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, बुधवारी राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत राज्यात ७२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.