पिंपरी – दुकान सुरू ठेवण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी एकजण शहरातील एका पोलिस ठाण्यात आला होता. त्याने या कामानिमित्त अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या भेटीगाठी घेतल्या. तो व्यावसायिक करोना बाधित असल्याचे बुधवारी (दि. ८) निष्पन्न झाले. यामुळे ‘त्या’ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची पाचावर धारण बसली आहे.
करोना बाधित रुग्ण आढळल्याने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने शहरातील काही परिसर सील केला आहे. मात्र आपला व्यवसाय जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत येत असल्याने आपल्याला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, या मागणीसाठी तो व्यावसायिक शहरातील संबंधित पोलीस ठाण्यात आला होता. त्याने परवानगी मिळावी यासाठी अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या भेटीगाठी घेतल्या.
बुधवारी आलेल्या अहवालात तो व्यावसायिक करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची पाचावर धारण बसली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ‘त्या’ पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे.