इंफाळ – मणिपूरमध्ये कुकी बंडखोरांनी भाजपला पाठिंबा देऊ केल्याचे निवेदन जाहीर केले आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने चिंता व्यक्त केली आहे. कॉंग्रेस पक्षाने या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आपली चिंता कळवली आहे. कुकी नॅशनल ग्रुपने मणिपूरमधील सत्ताधारी भाजपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे निवडणूक प्रक्रियेला, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात मतदान होण्याला धोका असल्याचा स्पष्ट संदेशच मिळतो आहे, असे कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या निवेदनावर माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश आणि सलमान खुर्शिद यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. कुकी संघटनेचे हे निवेदन म्हणजे मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या सामंजस्यातून हे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले असल्याची टीका मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोडी सिंह यांनी केली आहे.
कुकी नॅशनल ऑर्गनायजेशनने प्रसिद्धीस दिलेल्या या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष पीएस हाओकिप यांनी स्वाक्षरी केली आहे. हे निवेदन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र सरकारी वृत्तसंस्थेद्वारे अद्याप या निवेदनाची सत्यता पडताळून बघितली जाऊ शकलेली नाही.