उधमपूर – जम्मू आणि काश्मीरमधील शांतता भंग करण्याच्या उद्देशाने, पाकिस्तानी ड्रोनने बुधवारी या प्रदेशात ग्रेनेड, आयईडी, पिस्तूल आणि दारूगोळा टाकला. तथापी या शस्त्रसाठ्यात प्रथमच द्रव स्वरूपात एक रसायनही पाठवण्यात आले होते, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग म्हणाले, हे द्रवरूप रसायन नेमक्या कोणत्या स्वरूपाचे आहे याचे विश्लेषण आम्ही करीत आहोत. हे द्रवरूप रसायन स्फोटकाचे किंवा अंमलीपदार्थाचेही असू शकते असे सांगण्यात येत आहे. येथे अंमली पदार्थांचा पुरवठा करून त्यातून मिळालेल्या पैशाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जातो.
काश्मीरात अधिकाधिक शस्त्रास्त्रे पाठवून दहशतीच्या कारवायांना उत्तेजन देण्याचा शेजारील राष्ट्राचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रयत्न आहे. तथापि हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असेही दिलबाग सिंग यांनी सांगितले. ते म्हणाले की गेल्या वर्षी आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात राबवलेल्या मोहीमेमध्ये 182 दहशतवादी मारले गेले आहेत.