लखनौ – लखनौ विद्यापीठाच्या प्राध्यापकाने काशी विश्वनाथ मंदिराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे एक नवीनच वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली असून हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल या प्राध्यापकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
प्राध्यापक रविकांत चंदन यांच्या वक्तव्याची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर समोर आल्यानंतर मंगळवारी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला, असे अभाविपच्या अवध प्रांतांचे समन्वयक अंशुल श्रीवास्तवच्या यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
लखनौ विद्यापीठ प्रशासनाने या प्राध्यापकांकडून लेखी स्पष्टीकरण मागितले आहे; परंतु त्यांनी अशी कोणतीही सूचना मिळाली नसल्याचे सांगितले.
सोशल मीडियावरच्या एका वार्तालापाच्या कार्यक्रमात आपण काशी विश्वनाथ मंदिराबाबत पट्टभी सीतारामय्या यांच्या “फिदर्स ऍन्ड स्टोन्स’ या पुस्तकातील काही संदर्भ सांगितले होते. मात्र, अभाविप आणि अन्य संघटनांनी या व्हिडिओतील काही अंश केवळ खोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लोकभावना भडकावण्यासाठीच दाखवला, असे प्रा. चंदन यांनी सांगितले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्या विरोधात आंदोलन केले, असे प्राध्यापक पुढे म्हणाले.