अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ
तळेगाव दाभाडे – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी (दि. 1) पहाटे एकच्या सुमारास अवैधरित्या परराज्यातून आणलेल्या मद्याचा कंटेनर पकडला. पुढील कारवाईसाठी कंटेनर तळेगाव दाभाडे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात नेत असताना यातील चालक व इतर अनोळखी इसमांनी अधिकारी व कर्मचारी यांना दमदाटी करून कंटेनर पळवून नेला.
गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात बंदी असलेल्या मद्याने हा कंटेनर भरला होता. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या मद्याची बनावट कागदपत्रे बनवून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास मिळाली होती.
त्यानुसार निरीक्षक एस.आर.लाड, दुय्यम निरीक्षक योगेश फटांगडे, कर्मचारी रवी पाटील, अमोल चिलगर यांचे पथक गस्तीवर होते. त्यांना सोमाटणे जवळील शंकरवाडी हद्दीतील जुना पुणे-मुंबई महामार्गावर (एम. एच. 20, डीई 0207) क्रमांकाच्या कंटेनरमध्ये गोवा राज्य निर्मित मद्याचा साठा आढळला. त्यानंतर पुढील कारवाईसाठी तळेगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात कंटेनर आणण्यात आला.
दरम्यान कंटेनरचालक माने व त्याचा साथीदार रोहित खंदारे (रा. सोलापूर) यांनी आणि हुंदाई कार (क्र. एम. एच. 12 सीडी 2713) व होंडा सिटी कार (क्र. एम. एच. 12 डीएम 2020) या दोन कारमधील अनोळखी इसमांनी कंटेनर त्यांच्या ताब्यात द्यावा, अन्यथा कंटेनर पेटून देऊ, अशी धमकी दिली. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांशी झटापट, शिवीगाळ व दमदाटी करून कंटेनर पळवून नेला.