पुणे, -वडिलांचा कीर्तनकाराचा वारसा पुढे चालवण्यात अपयशी झालेल्या नवोदित कीर्तनकाराने चक्क कार सायलेन्सर चोरीचा मार्ग अवलंबला. एका विशिष्ट कंपनीच्या विशीष्ट मॉडेलचेच सायलेन्सर चोरत होता. यातील पॅलेडियम धातूच्या पावडरीला सोन्याचा भाव असल्याने तो एक किलो पॅलिडियम धातूच्या पावडरद्वारे 15 हजार रुपये मध्यस्थामार्फत कमवत होता.
लोणीकाळभोर पोलिसांनी त्याला साथीदारासह 16 एप्रिलला पकडल्यावर पाच गुन्हे उघडकीस आले होते. त्याच्या पोलीस कोठडीतील तपासणीत आणखी नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. एकंदर त्याच्याकडून 14 सायलेन्सर चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. कीर्तनकार शिवप्रसाद पंढरीनाथ रोकडे (21) आणि राम राजेश ढोले (20, दोघेही रा. आळंदी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार लोणी काळभोर परिसरात मारुती इको कारचे सायलेन्सर चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. पोलिसांनी रोकडे आणि ढोले यांना अटक करुन हद्दीतील पाच गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्याकडून 3 लाख 60 हजार रुपयांचे ऐवज हस्तगत करण्यात आला. त्यांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सुभाष काळे यांचे मार्गदशनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, नितीन गायकवाड, संतोष होले, सुनील नागलोत, श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर,अमित साळुंखे, सागर वनवे, राजेश दराडे, बाजीराव वीर, शैलेश कुदळे, दिगंबर साळुंके, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली.
…त्या मातीला सोन्याचा भाव
सुझुकी इको गाडीच्या सायलेंन्सरमध्ये पॅलेडियमचे प्रमाण जास्त आहे. याच्या शुध्द पावडरला बाजारात सोन्यापेक्षा भाव आहे. व्हॅनच्या विशिष्ट मॉडेलमधील सायलेंन्सरच्या आत एक कॅथेलिक कनर्व्हरटर असतो. त्यामधील फिल्टरमध्ये जवळपास 500 ते 600 ग्रॅम पॅलिडियम मिश्रीत धातूची माती असते. एक किलो माती विकल्यास आरोपींना जवळसाप 15 ते 16 हजार रुपये मिळत होते. या धातूची शुद्ध स्वरुपातील प्रती ग्रॅमची किंमत तीन हजार इतकी आहे. प्लॅटिनियम आणि पॅलेडियम हे दोन्ही धातू सोन्यापेक्षा महाग आहेत.
..असा बनला सराईत सायलेंन्सर चोर
शिवप्रसाद रोकडे याचे वडिल आळंदीत कीर्तनकार आहेत. त्याने वडिलांबरोबर काही काळ कीर्तनाचे कार्यक्रम केले. मात्र त्याला यश आले नाही. यामुळे तो चाकण चौकातील एका गॅरेजमध्ये कामाला लागला. तेथे उत्तर प्रदेशातील काही तरुण कामाला होते. त्यांनी शिवप्रसादला ईको व्हॅनचे सायलेंन्सरमध्ये महागडा धातू असून तो विकल्यास चांगले पैसे मिळत असल्याचे सांगितले. यानंतर त्याने ओळखीच्या राम ढोलेला मदतीला घेऊन सायलेंन्सर चोरायला सुरवात केली. या सायलेंन्सरमधील मटेरिअल मध्यस्थांमार्फत शाहबाज खान नावाच्या व्यक्तीला विकले जात होते. शाहबाज खान हा उत्तर प्रदेशात रहातो. तो विकत घेतलेल्या मातीतून धातू वेगळा करुन त्याची विक्री करतो.