पुणे – ससून रुग्णालयातून मेफेड्रोन तस्करीतील आरोपी ललित पाटील याच्यासह तीनही अटक आरोपींच्या नाशिक येथील घरांची पोलिसांनी झडती घेतली. त्यात पेन ड्राइव्ह आणि मोबाइल जप्त करण्यात आले. त्यातील डेटाचे विश्लेषण करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. तर, ललित याच्या मोबाइलचा पासवर्ड शोधण्यासाठी ऍपल कंपनीकडे संपर्क साधण्यात आला आहे.
सुभाष मंडल (29, रा. देहू रस्ता, मुळ रा. झारखंड) आणि ससून रुग्णालयाचा कॅन्टीन कर्मचारी रौफ रहीम शेख (19, रा. ताडिवाला रस्ता) हे कोठडीत आहेत. तर आरोपी ललित पाटील (34), भूषण सुभाष पाटील (रा. नाशिक) आणि अभिषेक बलकवडे हे फरार आहेत. पाटील याला पळून जाण्यास मदत करणारा वाहनचालक दत्ता डोके यालाही अटक करण्यात आली. मंडल, शेख यांची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी पक्षातर्फे वामन कोळी यांनी बाजू मांडली. तर बचाव पक्षातर्फे ऍड. शिवप्रसाद साळुंके यांनी काम पाहिले.
मंडल व शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी
पाटील याच्या मदतीने शेख याने इतर कोणाला अमली पदार्थ विकले, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने अटक आरोपींना विश्वासात घेऊन सीडीआरच्या आधारे तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वामन कोळी यांनी केला. तर बचाव पक्षातर्फे ऍड. शिवप्रसाद साळुंके यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.