वडूज -लॉकडाऊनमुळे सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव येथील यशवंतबाबा आश्रम, मंदिर परिसर बंद ठेवण्यात आला आहे. आश्रमातील नियमित उपक्रम बंद असल्याने आर्थिक स्रोत बंद झाला आहे. त्यामुळे मंदिराचे बांधकाम ठप्प झाले होते. दानशूर नागरिकांनी मंदिराच्या कामासाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार गोडसे, विश्वस्त राजेंद्र देशमुख, कुमार शेटे, काका सुतार, गजानन कुंभार यांनी केले आहे.
कुरोली येथे श्री यशवंतबाबांच्या हेमाडपंथी मंदिराच्या या बांधकामास 2009 पासून सुरुवात झाली. या बांधकामास तब्बल 11 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत साडेचार कोटींचे काम झाले. मूळ समाधी मंदिराचे काम सुरू असून सभामंडप, पहिला मजला, कलशाचे काम बाकी आहे. या कामासाठी गुरूपौर्णिमा उत्सव, पुण्यतिथी उत्सव, महारिंगण सोहळा, प्रकट दिन, पौर्णिमा, अमावास्या व दर गुरुवारी येणाऱ्या भाविकांकडून यशाशक्ती देणगी मिळत होती; परंतु 19 मार्चपासून आश्रमातील नियमित उपक्रम बंद असल्याने देणग्या बंद झाल्या आहेत.
आगामी काळात पुण्यस्मरण दिन व गुरूपौर्णिमा उत्सवांवर करोनाचे सावट असल्याने मंदिर बांधकामासाठी खर्च करणे जिकिरीचे झाले आहे. बांधकामासाठी दर आठवड्याला 50 ते 60 हजार रुपये मजुरीवर खर्च होतो. याशिवाय नियमित उपकमांसाठीही आर्थिक अडचण जाणवत आहे. या परिस्थितीत समाजातील दानशूर व्यक्तींना सढळ हस्ते देणगी द्यावी. स्टेट बॅंक, वडूज शाखा, खाते नं. 30817158160, आयएफएससी कोड – एसबीआयएन 0000284 व कराड अर्बन बॅंक, वडूज शाखा, खाते नं. 1009016000630, आयएफएससी कोड – 0455009 या खात्यांवर देणग्या जमा कराव्यात, असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.