पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) -पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते रेंजहील दरम्यान 12 किमी उन्नत मार्गाच्या शेवटच्या सेगमेंटची उभारणी पुणे मेट्रोकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावर लवकरच मेट्रो धावण्याची चाचणी होणार आहे. या चाचणीनंतर फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक हा मार्ग प्रवाश्यांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंजहिल स्थानक या 12.064 किमी उन्नत मार्गासाठी एकूण 3934 सेगमेंट बनविण्यात आले होते. या सेगमेंटद्वारे 451 स्पॅन उभारण्यात आले. 12.064 किमीचा उन्नत मार्ग बनविण्यात आला. संपूर्ण 12.064 किमी उन्नत मार्गाचे व्हाया डक्टचे काम पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यासाठी सैन्यदलाकडून हॅरिस पूल ते खडकी येथील जागा पाठपुरावा करून जुलै 2022 मध्ये मिळविली.
फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट स्थानक, गरवारे महाविद्यालय ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावरील कामे 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन मेट्रोने केले आहे. त्याला अनुसरूनच शेवटच्या सेगमेंटची उभारणी होत आहे. सैन्यदलाकडील जमीन, करोना आणि वाहतूक नियमन इत्यादी अडचणींवर मात करून 12.064 किमी उन्नत मार्गाचे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2022 अखेर हे काम पूर्णत्वास घेऊन जाणे शक्य होईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.