किसान क्रांतीच्या प्रचार सभेत महेश ढमढेरे यांची सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका
मांडवगण फराटा : घोडगंगा साखर कारखाना हा अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असे अशी घणाघाती टीका विद्या सहकारी बॅंकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी केली.
रांजणगाव सांडस (शिरूर) येथे घोडगंगा किसान क्रांतीच्या प्रचार सभेत महेश ढमढेरे बोलत होते. ते म्हणाले, ‘आमदार अशोक पवार यांची घोडगंगा कारखान्यातली हुकूमशाही मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आमदार शेतकऱ्यांच्या पैशाचा प्रवासखर्च तसेच कोर्टात गैरवापर करत असून हा पैसा यांच्या घराचा आहे का? सध्या तुम्ही फक्त घोडगंगा कारखान्याच्या प्रश्नावरच बोला.
तालुक्यातील विकासावर बोलू नका. घोडगंगाचे कामगार आमदार पवार स्वतःच्या खासगी व्यंकटेश साखर कारखान्यात वापरतात.
‘राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्वपक्षीय असे घोडगंगा किसान क्रांती पॅनल उभे केले आहे. घोडगंगा साखर कारखान्याची सर्वसाधारण सभाशास्त्राच्या नियमानुसार व्हायला हवी.होती; परंतु सभासदांच्या प्रश्नांना उत्तर अध्यक्षांना द्यायची नसल्याने त्यांनी सभा उधळून लावली. घोडगंगा कारखाना हा कुणाच्या मालकीचा नसून सभासदांचा आहे. एकीकडे मेहुण्याचा साखर कारखाना पाच वर्षात नील होतो; पण आपला कारखान्याचे कर्ज कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. याचा सुज्ञ सभासदांनी विचार करायला हवा.
खासगी साखर कारखान्याशी माझा काहीएक संबंध नाही, असे सांगणारे तो कारखाना कर्जमुक्त झाल्यावर मेहुण्यांना पेढे भरवतात.
‘गेल्या 25 वर्षांत घोडगंगा सहकारी कारखान्यात केलेली लूट लोकांना कळू नये तसेच स्वतःचे पाप झाकण्यासाठी विद्यमान अध्यक्ष अशोक पवार यांनी सर्वसाधारण सभेत सभासदांचा आवाज दाबला. त्यामुळे हा कारखाना वाचला पाहिजे म्हणून आम्ही सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन लढा देत आहोत.
गेल्या 25 वर्षांत अशोक पवार यांनी घोडगंगा कारखान्यावर 450 कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे; परंतु घोडगंगा साखर कारखाना हा शिरूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची कामधेनू असून शेतकरी याचे खरे मालक आहेत. यावेळी घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, ऍड. सुरेश लवांडे, आबासाहेब गव्हाणे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे, राहुल गवारी, कैलास सोनवणे आदीसह घोडगंगा किसान क्रांती पॅनलचे उमेदवार व ग्रामस्थ उपस्थित होते.