पिंपरी -जबाबदार नागरिक बनण्यासाठी सर्व देशवासीयांनी ‘संविधान’ वाचून समजून घेतले पाहिजे. मुलं लहान असतानाच त्यांना संविधानाचे बाळकडू पाजल्यास ते अधिक शक्तिशाली, सामर्थ्यवान आणि जबाबदार नागरिक बनतील, असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.
बुधवारी (दि. 26) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्तालयात शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांना संविधान आणि ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. त्यावेळी सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, अजय जोगदंड, देवेंद्र चव्हाण, डॉ. संजय तुंगार आणि सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी बोलताना कृष्ण प्रकाश यांनी दैनंदिन जीवनातील संविधानाचे महत्व समजावून सांगितले. ते म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकाने संविधान वाचून समजून घेतले पाहिजे.
संविधानामुळे आपल्याला स्वतःचीच नव्याने ओळख होते. स्वतःसह इतरांचे अधिकार, कर्तव्य माहिती झाल्याने नागरिक जबाबदारीने वागतात. संविधानाचा खरा पाईक असलेला नागरिक कधीही चुकीचे काम करणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने संविधान समजून घेणे ही काळाची गरज आहे. कृष्ण प्रकाश यांच्या मनोगतानंतर त्यांच्य्या हस्ते “विकास’ अनाथ आश्रमातील मुलांना संविधानाची प्रत आणि ब्लॅंकेट व चॉकलेटस देण्यात आली.