मुंबई – ग्लोबल वार्मिंगमुळे होत असलेले बदल हे मनुष्यासाठी अत्यंत घातक आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर जगणे मुश्कील होईल, त्यामुळे पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून आपणा सर्वांची ती जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षाचा पर्यावरण सेल पर्यावरणासाठी करत असलेले काम अत्यंत कौतुकास्पद असून या कामात खंड पडू न देता पर्यावरण रक्षण करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण सेलच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला यावेळी ते बोलेत होते. या कार्यक्रमाला महसूलमंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, भावना जैन, पर्यावरण सेलचे अध्यक्ष समीर वर्तक आदी उपस्थित होते.
पटोले पुढे म्हणाले की, पर्यावरणातील बदलामुळे हिमालयातील बर्फही वितळू लागला आहे, या बदलाचा फटका समुद्रकिनारी असलेल्या शहरांना बसत आहे. पर्यावरणाच्या समस्या वाढल्या आहेत त्यामुळे झाडं लावणे व जोपसण्याला प्राधान्य दिले पाहिजे.
यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पर्यावरण सेलचे काम किती मोलाचे व महत्वाचे आहे हे आपण आरे बचाव आंदोलनात पाहिले. या आंदोलनातून दिलेला संदेश अत्यंत महत्वाचा आहे. प्राण गेले तरी मागे हटणार नाही ही पर्यावरण प्रेमींची भूमिका वाखणण्यासारखी आहे. चिपको आंदोलनाएवढेच आरेतील वृक्ष बचावचे आंदोलन महत्वाचे होते. पर्यावरण रक्षणाची जशी आपली जबबादारी आहे तशीच लोकशाही व संविधान वाचवण्याची जबाबदारीही आहे, असे थोरात म्हणाले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा अध्यक्ष हर्षद खंडागळे व त्यांचे सर्व समर्थक तसेच वसईच्या कोपर गावातील संदीप किणी, देवेंद्र पाटील, पंढरी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
आरे आंदोलनात वृक्ष वाचवण्यासाठी तरुंगात गेलेले सामाजिक कार्यकर्ते शशी सोनावणे, प्रशांत कांबळे, संदीप परब, प्रमिला भोईर, मयुर आग्रे, विजयकुमार कांबळे, श्रीधर, सोनाली, संदेश आणि कमलेश यांचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पर्यावरण सेलच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळाही पार पडला.