भाजपला मदत केल्यावरून कॉंग्रेसचा राष्ट्रवादीवर ‘निशाणा’

पुणे- “पीएमआरडीए’ नियोजन समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची विनंती डावलत कॉंग्रेसने उमेदवार उभा केला होता. त्यावेळी कॉंग्रेस आघाडी धर्म विसरल्याची टीका राष्ट्रवादीने केली होती. त्यानंतर आता कॉंग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. “स्मार्ट सिटीच्या सिग्नल यंत्रणेवरील 58 कोटींच्या उधळपट्टीला मुख्यसभेत मान्यता देत भाजपशी हात मिळवणी करणाऱ्या आघाडीतील घटकपक्षांनी आत्मपरीक्षण करावे,’ असा सल्ला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला आहे.

बागवे यांच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, “हे 58 कोटी रुपयांचे काम भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या संबंधित ठेकेदाराला मिळाले आहे. कॉंग्रेसने याबाबत सभेत प्रश्‍न उपस्थित केला होता आणि प्रकल्पाला विरोध केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही प्रकल्पाला विरोध करत आंदोलनही केले होते. कॉंग्रेसची भूमिका सुरुवातीपासूनच या ठरावाला विरोधाची होती. या उलट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भाजपशी हातमिळवणी करून प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले.

भाजपने शहरात गेल्या 5 वर्षांत केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे महाविकास आघाडीने ठरवले होते. असे असताना आघाडीच्या घटक पक्षांनी ऐनवेळी घुमजाव करून भाजपला सहकार्य केले, ही स्थिती चिंताजनक आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाने भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिल्याचा हा प्रकार आहे.’

…तर न्यायालयात जाणार : बागूल
सिग्नल यंत्रणेसाठी 58 कोटींच्या खर्चास मुख्यसभेने मंजुरी दिली असेल, तरीही महानगरपालिकेच्या तिजोरीतून अशा प्रकारे पैसे देणे बेकायदेशीर आहे. या ठरावाची अंमजबजावणी करू नये, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी आयुक्तांकडे केली आहे. महानगरपालिका हद्दीत कामे करण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयाकडून निविदा प्रक्रिया राबवणे चुकीचे आहे. परंतु, राजकीय दबावाने स्मार्ट सिटी कार्यालयाकडून महानगरपालिका हद्दीतील कोट्यवधी रुपयांच्या निविदा राबवणे, म्हणजे डल्ला मारण्याचा प्रकार आहे. आपल्या हद्दीतील कामे महापालिकेनेच करावीत, अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा आबा बागूल यांनी आयुक्‍तांना दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.