नवी दिल्ली – करोना संसर्ग देशात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. तर अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पीएम केअर फंडातून राज्यांना व्हेंटीलेटरसह आरोग्य साहित्य देण्यात आलं होतं. मात्र यापैकी बरेच व्हेंटीलेटर बंद आहेत. पीएम केअरमधून दिलेले व्हेटिंलेटर्स कमकुवत असून त्यासंदर्भात सुरु असलेली सारवासारवही उघड झाली आहे.
भाजपा नेत्यांचं खोटं उघड पाडणाऱ्या औरंगाबाद शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या १७ मेच्या वस्तूस्थितीदर्शक अहवालाने केंद्र सरकार तसेच गुजरात भाजपा नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडला. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या उत्तराने केंद्र सरकारच्या कांगाव्याची पोलखोल झाली आहे. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकरांशी बोलतांना म्हटले आहे.
सचिन सावंत यांनी भाजप नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले आहे की,’जनतेच्या जीवापेक्षा मोदींची प्रतिमा महत्वाची वाटणाऱ्या या नेत्यांनी हे व्हेंटिलेटर चालू करुन दाखवावे असे आव्हान करत भाजप नेत्यांवर बोचरी टीका केली आहे.
तत्पूर्वी, काँग्रेस ने केंद्र सरकारने पीएमकेअर्स फंडातून महाराष्ट्राला दिलेल्या सर्व व्हेंटिलेटरची चौकशी करून कारवाई करावी अशी राज्य सरकारला मागणी केली होती.