पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचा “झेंडामार्च’
पुणे – कॉंग्रेस पक्षाच्या 135 व्या स्थापना दिनानिमित्त संविधान वाचवण्यासाठी आणि देश एकसंघ राहण्यासाठी “झेंडामार्च’चे आयोजन शहर कॉंग्रेसतर्फे करण्यात आले होते. कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली याचे आयोजन करण्यात आले.
मोदी सरकार हे जाती आणि धर्मांमध्ये एन.आर.सी. आणि सी.ए.ए. च्या माध्यमातून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या घटनेला धक्का पोहचवण्याचे काम हे केंद्रातील सरकार करीत आहे. याच्या निषेधार्थ देशभरात बंधुता आणि समानता राहावी आणि देशामध्ये लोकशाही टिकावी, यासाठीच या “झेंडामार्च’ चे आयोजन केल्याचे बागवे यांनी सांगितले.
कॉंग्रेस भवन येथून सुरू झालेला हा “झेंडामार्च’ जिल्हाधिकारी कार्यालय येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समाप्त करण्यात आला. यामध्ये प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, पक्षनेते अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, संगीता तिवारी आदींची भाषणे यावेळी झाली. तसेच यावेळी माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, नीता रजपूत, दत्ता बहिरट, वीरेंद्र किराड, लता राजगुरू आदी उपस्थित होते.