मुख्यमंत्री कार्यालयातून नावे जाहीर होण्याआधीच पक्षाकडून प्रकाशित
मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयातून खाते वाटप जाहीर होण्याआधी कॉंग्रेसने आपल्या कोट्यातील खात्यांचे वाटप जाहीर केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना महसूल तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले आहे. नितीन राऊत यांच्या वाटेला उर्जा खाते आलेले आहे.
विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्गीय जाती, खार जमीन, मदत आणि पूनर्वसन या खात्यांचा अधिभार असेल. आदिवासीबहूल नंदूरबार जिल्ह्यातील के. सी. पडवी यांच्याकडे आदिवासी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. यशोमती ठाकूर यांच्याकडे महिला बालकल्याण तर अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खाते सोपवण्यात आले असून सुनील केदार यांच्याकडे डेअरी विकास आणि पशु संवर्धन खाते देण्यात आले आहे. वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण तर अस्लम शेख यांच्याकडे कापड उद्योग, मत्स्य आणि बंदरे ही खाती सोपवण्यात आली आहेत.
सतेज पाटील यांच्याकडे गृहनिर्माण राज्यमंत्रीपद असेल. तर डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे कृषी आणि सहकार खात्याचे राज्यमंत्रीपद असेल. कॉंग्रेसने शिवसेनकडील कृषी आणि राष्ट्रवादीकडील ग्रामीण विकास खात्यांसाठी आग्रह धरला. मात्र त्याला या दोन्ही पक्षांनी विरोध केला. अखेर ठाकरे यांनी हस्तक्षेप करत शिवसेनेच्या कोट्यातील खार जमीन आणि सांस्कृतिक ही दोन खाती कॉंग्रेसला दिली.
दरम्यान, कॉंग्रेसने जिल्हा पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात अशोक चव्हाण (नांदेड), नितीन राऊत (नागपूर), वडेट्टीवार (चंद्रपूर), के. सी. पडवी (नंदूरबार), सुनील केदार (वर्धा), यशोमती ठाकूर (अमरावती), अस्लम शेख (मुंबई शहर) आणि सतेज पाटील(कोल्हापूर) यांचा समावेश आहे.