कोटा (राजस्थान) : राजस्थानच्या कोटा इथल्या जे के लोन रुग्णालयात झालेल्या बालकांच्या मृत्यूमुळे आपल्याला अतीव दुःख झाले असून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे, असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले आहे.
या रुग्णालयाला भेट दिल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. याबाबतीत सरकारचा कोणताही प्रतिसाद समाधानकारक असू शकत नाही. ज्यांनी आपली मुले गमावली आहेत ,ते तो स्वीकारणार नाहीत. यासंदर्भात पूर्वीच्या भाजपच्या सरकारला दोष देण्यात अर्थ नाही, असेही ते म्हणाले.
जर एवढ्या कमी वेळात इतकी मुले दगावली असतील तर त्याच काही कारण असेल, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळातले इतर सहकारीही उपस्थित होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही रुग्णालयाला भेट देऊन सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
दरम्यान ज्येष्ठ बालरोग तज्ञ आणि इतर डॉक्टरांचे पथक इथे पोहोचले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. केंद्रिय पथकाबरोबर राज्याच्या आरोग्य विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.