नवी दिल्ली – कॉंग्रेसने लोकसभेच्या राखीव जागांसाठी 50 समन्वयकांची नियुक्ती केली. त्यामुळे भाजपप्रमाणेच कॉंग्रेसनेही मिशन 2024 हाती घेतल्याचे सूचित होत आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपने आधीपासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
आता कॉंग्रेसनेही तयारीत मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. त्या पक्षाने अनुसूचित जाती आणि जमातींसाठी (एससी/एसटी) राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये समन्वयक नेमले आहेत. त्यामध्ये शिर्डी, लातूर, सोलापूर आणि गडचिरोली-चिमूर या महाराष्ट्रातील जागांचाही समावेश आहे.
आगामी लोकसभा निवडणूक पुढील वर्षीच्या एप्रिल-मेमध्ये होईल. त्या निवडणुकीसाठी आता फार अवधी उरलेला नाही. ती बाब ध्यानात घेऊन राजकीय पक्ष सज्ज होत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकीत काॅंग्रेसला फायदा होणार का हे पाहावे लागणार आहे.