नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसू शकतो. हार्दिक पटेल आणि भाजप नेतृत्वात चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीत त्यांनी एका बड्या नेत्याचीही भेट घेतली आहे. त्यामुळे हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. हार्दिक पटेल काँग्रेस हायकमांडवर नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.
अहमदाबादमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना हार्दिक पटेल लवकरच काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार का, असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. हार्दिकच्या व्हॉट्सअॅपच्या नवीन डीपीमध्ये तो भगवा गमछा परिधान केलेला दिसत आहे. पटेलने व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामचा डिस्प्ले प्रोफाईल फोटो बदलला आहे.
कॉंग्रेसवर नाराज असल्याचे सांगत हार्दिकने हिंदू असल्याचा अभिमान असल्याचेही सांगितले. गुजरातमध्ये याच वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटीदार नेते नरेश पटेल यांना पक्षात सामावून घेण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांवर हार्दिक नाराज आहे आणि नरेश यांनी पक्षात प्रवेश घेतल्यास पाटीदार समाजाचा नेता म्हणून त्याचा (हार्दिकचा) प्रभाव संपुष्टात येईल, अशी त्याला भीती आहे.
हार्दिक पटेल सध्या गुजरात काँग्रेसचा कार्याध्यक्ष आहे. मात्र काही काळापासून तो पक्षाच्या हायकमांडवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याने याआधी अनेकदा उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमध्ये त्यांची अवस्था नव्या वराची नसबंदी केल्यासारखी आहे असेही तो म्हणाला होता.