लोकसभेत काँग्रेसला आवाजच उरला नाही; दिग्गज नेत्यांचा पराभव

 सलग दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेत्याचे अधिकृत पद नसणार

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. गेल्या पाच वर्षांत कॉंग्रेसच्या खासदारांची संख्या केवळ आठने वाढून 52 वर पोहोचली आहे. परंतु ही संख्या वाढण्यापूर्वी कॉंग्रेसने असे चेहरे गमावले आहेत, जे संसदेत कॉंग्रेसचा आवाज बनले होते.

कॉंग्रेसने गमावलेला संसदेतला पहिला चेहरा म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे. कर्नाटकमधील गुलबर्गा मतदारसंघातून मल्लिकार्जुन खर्गे पराभूत झाले आहेत. त्यापाठोपाठ ज्योतिरादित्य शिंदे, हरियाणातील दीपेंदर सिंह हुड्डा, आसामच्या सुष्मिता सिंह या नेत्यांना पराभवाचा तडाखा बसला आहे.

खर्गे, शिंदे, हुड्डा ही मंडळी संसदेतील प्रत्येक चर्चेत सहभागी होत होती. लोकसभेत कॉंग्रेसची भूमिका मांडण्याचे काम हे नेते करत होते. त्यातही ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे कॉंग्रेसचे भावी गटनेते म्हणूनही पाहिले जात होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद न दिल्यामुळे किमान राष्ट्रीय राजकारणात प्रभावी राहील, असे ज्योतिरादित्य यांच्याबद्दल म्हटले जात होते. परंतु आता ते स्वत:च पराभूत झाल्याने तीही आशा मावळली आहे. शशी थरुर सोडले तर लोकसभेत कॉंग्रेसकडे एकही प्रभावी नेता, प्रभावी वक्ता नाही. त्यातही शशी थरुर यांच्या वक्तृत्वाला, कामकाजाला केवळ इंग्लिश वर्तुळापर्यंत मर्यादा आहेत.

2014 च्या निवडणुकीवेळी कॉंग्रेसच्या खासदारांचा आकडा 44 होता, परंतु कॉंग्रेसकडे खर्गे, ज्योतिरादित्य शिंदे, दीपेंदर हुड्डा, सुष्मिता सिंह, राजीव सातव, के. सी. वेणुगोपाल या आक्रमक नेत्यांची फौज होती. ही सगळी नेतेमंडळी सभागृहात आक्रमकपणे भाजपला लक्ष्य करत होती. राहुल गांधींच्या बाजूने खंबीरपणे उभी होती. परंतु राहुल गांधी लोकसभेत खमक्‍या नेत्यांअभावी एकटे पडणार असल्याचे दिसत आहे.

लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान 55 खासदार असायला हवेत. परंतु कॉंग्रेस याहीवेळेला तो आकडा पार करु शकलेली नाही. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा लोकसभेला विरोधी पक्षनेत्याचे अधिकृत पद नसेल.

लोकसभेत राहुल गांधी स्वतः काही महत्वाच्या डिबेटवरच बोलायला उभे राहतात. एरव्ही सरकारला धारेवर धरण्यासाठी सभागृहात जे काम तडफेने करावे लागते, ते कॉंग्रेस कोणाच्या विश्वासावर करणार, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.