पुणे – पुणेकरांना गुंजन चौकातून थेट वडगावशेरीपर्यंंत जाता येणार आहे. गुंजन चौकातून रस्ता मेट्रो मार्गिकेखालून नदीपात्रातील शिवणे रस्त्याला जोडला जाणार आहे. यामुळे कल्याणीनगर, वडगावशेरी, मुंढवा तसेच हडपसरकडे जाण्यासाठी आणखी एक मार्ग मिळणार आहे. सुमारे ३० मीटर रुंदीचा हा रस्ता आहे. गुंजन चौकातून तो जाणार आहे.
या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण असून अवघ्या ११० मीटर लांबीची जागा महामेट्रोकडे आहे. जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या बैठकीत मेट्रोने ही जागा महापालिकेस देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे उर्वरित कामासाठी निधीचा प्रस्ताव मनपा आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.
पथ विभागाकडून पुढील दोन महिन्यांत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही बहुतांश जागा मेट्रो मार्गाच्या खालील बाजूस असल्याने मेट्रोचा खांब मध्यभागी ठेऊन दोन्ही बाजूने रस्ता विकसित केला जाणार आहे. त्यासाठी महामेट्रोनेही मान्यता दिली आहे.
तर, महापालिकेस अवघा ११० मीटर लांबीचा रस्ता करायचा असल्याने हे काम निधी मिळाल्यास वेगाने करणे शक्य आहे. मात्र, त्याच वेळी गुंजन चौकापासून सुमारे २० मीटर पुढील बाजूस हा रस्ता असल्याने या भागात आणखी एक चौक होणार आहे. यामुळे पोलिसांच्या मदतीने वाहतूक नियोजन करावे लागणार असून, आणखी एक सिग्नल वाढणार आहे.
विनासिग्नल प्रवास
पुणे स्टेशन, खडकी तसेच विश्रांतवाडीकडून येणारी वाहने वडगाव शेरीत जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. तसेच शहरातून कल्याणीनगर अथवा वडगावशेरीला जाण्यासाठी नगररस्त्याचा जादा वापर केला जातो. त्यामुळे शास्त्रीनगर चौक आणि वडगावशेरी चौकात वाहनांची गर्दी असते. नवा रस्ता झाल्यास नदीपात्रातील रस्त्याने वाहनांना गुंजन चौकातून थेट कल्याणीनगर आणि पुढे वडगावशेरीत जाता येणार आहे. हा रस्ता मोठा असल्याने तसेच याला असलेल्या जोड रस्त्यांची संख्या कमी असल्याने नागारिकांना सिग्नलविना थेट कल्याणीनगरला पोहचता येईल.
“जागा मिळाल्याने या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव पालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी लवकरच ठेवला जाणार आहे. यामुळे पुणेकरांना आणखी एक नवीन रस्ता मिळणार आहे.” – विकास ढाकणे , अतिरिक्त आयुक्त, महापालिका