पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जाहीर होऊन अर्ज देखील भरण्यात आला. 7 फेब्रुवारी अर्थात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अद्याप महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार असणार हे चित्र देखील स्पष्ट झालेले नाही. यामुळे मविआतील घटक पक्ष मागील निवडणुकीप्रमाणे पोट निवडणुकीत उमेदवार देणार की नाहीत? अशी जोरदार चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी निधन झाले. त्यानंतर अवघ्या 15 दिवसात म्हणजे 18 जानेवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार अर्ज भरण्यासाठी आज मंगळवार (दि.7) शेवटचा दिवस आहे. तर दि. 8 फेब्रुवारी अर्जाची छाननी, 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. 26 फेब्रुवारीला मतदान असून 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
भाजपने आधीच उमेदवार जाहीर करुन सोमवारी अर्ज भरत प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. दुसरीकडे भाजपकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. इकडे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा घोळ संपता-संपत नाही. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नाही. तोंडावर महापालिका निवडणुका असतानाही महाविकास आघाडीने पोटनिवडणूक गांभीर्याने घेतली नाही का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या अधिक
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुक राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच लढावी, अशी शहरातील पदाधिकारी, माजी नगरसेवकांची मागणी असून तसा त्यांनी ठराव देखील केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीमध्ये आठ जण इच्छुक आहेत. या आठ जणांपैकी एकाला उमेदवारी मिळेल, अशी आशा शहरातील पदाधिकाऱ्यांना आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यासोबत याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अंतर्गत रस्सीखेचच्या चर्चा
चिंचवड आणि पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक होत आहे. जागा वाटपात कसब्याची जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आली असून तेथील उमेदवाराने सोमवारी उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. तर दुसरीकडे चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच उमेदवार जाहीर होण्यास वेळ लागत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.