ढेबेवाडी – कोणतीही परवानगी आणि खबरदारी न घेता सलग दुसऱ्याही आठवड्यात ढेबेवाडीचा आठवडा बाजार भरला. हा बाजार नक्की कोणी भरवला याबाबत संभ्रम आहे. ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणेने जबाबदारी झटकली आहे. त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, अशी त्यांची भूमिका असल्याने येथे बाजार भरवतंय तरी कोण..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
करोनाबाधित रुग्ण सापडलेली गावे करोनाचा संसर्ग वाढू नये आणि गाव लवकर करोनामुक्त व्हावे म्हणून स्वतःला शिस्तीत बांधून जेवढी काळजी घेत आहेत तेवढी काळजी परिसरात तब्बल 38 रुग्ण सापडूनही ढेबेवाडीकरांनी घेतलेली दिसत नाही. दररोज आजुबाजूच्या गावातील लोकांचे लोंढे येथील बाजारपेठेत धावत आहेत. ध्वनिक्षेपकावरून गर्दीला सूचना देतादेता पोलिसांचा घसा बसायची वेळ आली आहे. रस्ते, बॅंका व दुकानासमोरील गर्दी हटत नसल्याने दिवसेंदिवस परिस्थिती बिकट बनत आहे.
पाटण तालुक्यातील मोठ्या आठवडा बाजारांमध्ये समाविष्ट होणारा ढेबेवाडीचा आठवडा बाजार लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बंदच होता. मात्र, गेल्या आठवड्यात परवानगी नसतानाही विक्रेत्यांनी अचानकपणे बाजार भरवून यंत्रणेची डोकेदुखी वाढवली आहे. दि. 10 रोजी त्याची पुनरावृत्ती झाली. आठवडा बाजाराचा दिवस असल्याने सकाळपासून विक्रेत्यांनी येथे दुकाने थाटायला सुरुवात केली. विक्रेते सोशल डिस्टन्सिंगमध्ये बसलेले असले, तरी ग्राहक गर्दी करत पैशाच्या देवाणघेवाणी बरोबरच भाजीपाला व इतर वस्तू हाताळताना दिसत होते.
सलग दोन आठवडे येथे भरलेल्या बाजाराच्या परवानगीबाबत ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणेने जबाबदारी झटकत त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, अशीच भूमिका घेतल्याने मग बाजार भरवतंय तरी कोण..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरपंच विजय विगावे म्हणाले, सोशल डिस्टन्सिंगबाबत कडक पवित्रा घेतलेला आहे. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.