मसूर -करोना संकटकाळात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः आरोग्य, महसूल, स्वच्छता विभाग, पोलीस प्रशासन यांचे मोलाचे योगदान असल्याचे मत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. तळबीड, ता. कराड येथे त्यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, सभापती प्रणव ताटे, विनिता पलंगे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, डॉ. संगीता देशमुख, डॉ. संजय कुंभार, दाजी पवार, माणिकराव पाटील उपस्थित होते. ना. पाटील म्हणाले, करोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर सर्व प्रकारचे सन, उत्सव, लग्न व सभा-समारंभ आदी कार्यक्रमांवर प्रतिबंध लावण्यात आले.
लॉकडाऊन काहीप्रमाणात शिथील केल्यानंतर लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने संबंधित विभागाची कामे सुरू केली आहेत. त्या अनुषंगाने तळबीड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या नूतन इमारतीसाठी 49.83 लाख रूपये मंजूर झाले आहेत. सदरची इमारत 12.55 मी. बाय 6.99 मीटर आकाराची दोन मजली इमारत आहे. सुत्रसंचालन रमेश मोहिते यांनी केले. प्रास्ताविक सरपंच जयवंतराव मोहिते यांनी केले.