वॉशिंग्टन – अमेरिकेच्या उपाध्यक्षपदावरून पायउतार होताना आपण कोणतीही गोपनीय कागदपत्रे आपल्या बरोबर बाळगली नाहीत, असे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जोर देऊन म्हटले आहे. कागदपत्रांच्या हाताळणीबाबतच्या काही आरोपांबाबत विशेष वकिलांकडून बायडेन यांची तब्बल ५ तास सविस्तर मुलाखत घेण्यात आली.
या मुलाखतीचा सारांश न्याय विभागाकडून संसदेकडे सोपवण्यात आला आहे. कागदपत्रे आपण आपल्या बरोबर बाळगली नाहीत, हे पुन्हा पुन्हा सांगताना बायडेन यांनी काही कागरदपत्रे हाताळण्याच्या तारखा आणि तपशीलांबाबत आपल्याला स्मरण नसल्याचे कबूल केले.
यावरून बायडेन यांच्या क्षीण होत चाललेल्या स्मरणशक्तीच्या मुद्यावरून टीका केली जाऊ लागली आहे. विशेष वकील रॉबर्ट हर यांनी बायडेन यांची ही सविस्तर मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीचा निष्कर्ष काढताना हर यांनी कागदपत्रांच्या गैरहाताळणीबाबत बायडेन यांच्यावर गुम्हेगारी स्वरुपाचे आरोप ठेवण्यात येऊ नयेत, अशी शिफारस केली आहे. मात्र त्यांचे वय आणि त्यांची क्षमता लक्षात घेतली जावी, असा शेरा मारला आहे. बायडेन यांनी दिलेल्या जबाबामध्ये त्यांची स्मरणशक्ती स्पष्ट आणि निर्दोष असल्याचे दिसून येते, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
बराक ओबामा हे अमेरिकेचे अद्यक्ष असताना बायडेन २००९ ते २०१७ दरम्यान अमेरिकेचे उपाध्यक्ष होते. त्याकाळातील कागदपत्रांच्या तपशीलावरून बायडेन सविस्तर उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यांच्या बोलण्यामध्ये तेच ते मुद्दे येत होते. काही वेळा ते बोलताना अडखळत होते. मुलाखतीच्या लिखीत अवृत्तीमध्ये याचा उल्लेख झाला आहे.
यामुळे संसदेतील रिपब्लिकन सदस्यांकडून बायडेन यांची स्मरणशक्ती आता क्षीण होत चालली असल्याची टीका व्हायला लागली आहे. याच मुद्याचा फायदा अमेरिकेच्या अद्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन नेते आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेण्याची शक्यता आहे.