लाहोर – पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या सरकारने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात पक्षाच्या बैठका घेम्यास मज्जाव केला आहे. कुटुंबीय, पक्षाचे पदाधिकारी आणि वकिलांनाही भेटण्यास आता परवानगी असणार नाही.
मात्र इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने पंजाब प्रांताच्या निर्णयाला फॅसिस्ट म्हटले असून यानिर्णयाचा निषेध केला आहे. इम्रान खान यांचा आवाज दाबण्याचा हा आणखीन एक प्रयत्न असल्याचे पीटीआय पक्षाने म्हटले आहे.
पंजाबच्या गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार, देशातील विविध गुप्तचर संस्थांनी दिलेल्या धोक्याच्या सूचनांवर आधारित, रावळपिंडीच्या अदियाला जेलच्या सुरक्षेला विविध प्रकारचे धोके आहेत. इम्रान खान यांना याच तुरुंगात ठेवण्यात आले असल्यामुळे त्यांच्या बेटीगाठींवर निर्बंध आणण्यात आले आहेत.
दरम्यान पंजाब प्रांताच्या सरकारने निवडणुकीत जनमत चोरल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार पीटीआयने केला असून सरकारच्या कामगिरीवर देखरेख करण्यासाठी पीटीआयचे समांतर मंत्रिमंडळ स्थापन केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. माजी पंतप्रधान आणि पीएमएल-एन पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ यांच्या कन्या मरियम नवाझ यांच्याकडे पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.