प्रशांत जाधव
सातारा -करोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयाने बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनापासून काही प्रमाणात बचाव करण्यासाठी मोबाइल मिस्टिंग सॅनिटायझेशन वाहन (संजीवनी) सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस ठाणे स्तरावर “सॅनिटायझेशन चेंबर’ची निर्मिती करून पोलीसांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलले आहे.
अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक खोली तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये बंदोबस्तावरून आलेल्या पोलीसांना सॅनिटायझरचा वापर करून करोनापासून बचाव करता येणार आहे. पोलिस थेट नागरिकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यादृष्टीने ही व्यवस्था करण्यात आली आहे.
ही सुविधा बसविण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी कामाला लागले आहेत.दिवसभर राबणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी असलेला हा उपक्रम राज्यभर ग्रामीण पोलीस दल असलेल्या जिल्ह्यात “रोल मॉडेल’ म्हणून अनुकरणीय ठरण्याची शक्यता आहे. या सॅनिटायझर चेंबरमध्ये प्रेशर फॉगिंग सिस्टिम वापरण्यात येणार असून त्यामुळे बंदोबस्तावरून आलेले पोलीस निर्जंतुकीकरण होऊन त्याच्या घरी जाऊ शकणार आहे.
आधी सॅनिटायझर चेंबर मगच घर
पोलीस अधीक्षक सातपुते यांनी जिल्ह्यात पोलीस ठाणे स्तरावर तयार केलेल्या सॅनिटायझर चेंबर उपक्रमामुळे ड्युटी पॉईंटवरून थेट घराकडे जाणाऱ्या पोलीसांना आता आधी पोलीस ठाण्यात जाऊन सॅनिटायझरींग करूनच घरी जाता येणार आहे.
करोनाचा प्रसार वाढत असल्याने त्याची भीती नागरिकांना आहे, तशीच पोलीसांना आहे. त्यामुळे त्यांच्या व कुटुंबांच्या आरोग्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर हा उपक्रम राबवला आहे. करोनाशी दोन हात करत असताना पोलिसांचे आरोग्य महत्वाचे आहे.
तेजस्वी सातपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा.