पिंपरी – हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या संगणक अभियंत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्मत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 18) दुपारी दोनच्या सुमारास वाकड येथे उघडकीस आली.
प्रशांत नरेंद्र सेठ (वय 32, रा. कॅप्रेसिया सोसायटी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या सॉफ्टवेयर इंजिनीअरचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रशांत सेठ हे मूळचे मध्यप्रदेश येथील इंदोरचे रहिवासी आहेत. ते मागील काही वर्षांपासून वाकडमध्ये राहत असून हिंजवडीतील “टाटा टेक्नॉलॉजी’ या कंपनीत नोकरी करीत होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंध उरो रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
प्रशांत सेठ यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामध्ये आपण स्वतःहून आत्महत्या करीत असून, त्याबाबत कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे.