कोथरुड : चिनी सैन्याकडून सीमेवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महर्षी कर्वे पुतळा चौकात कोथरुड भाजपा युवा मोर्चाच्या वतीने चीनी वस्तूवर बहिष्कार घालत त्याची होळी करण्यात आली. यावेळी चिनी बनावटीचे टीव्ही व मोबाईल फोन कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आले.
भाजपा युवा मोर्चाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन घेण्यात आले. नगरसेवक जयंत भावे, पूनित जोशी, दिनेश माथवड, कोथरूड महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे, अभिजित राऊत, सचिन मोकाटे, अमित तोरडमल, दिपक पवार, समीर जोरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चिनी सैन्याकडून होणारे सततचे सीमाउल्लंघन, घुसखोरी याच्या विरोधात जनमानसात चीनला धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे. कोथरूड येथे कर्वे पुतळ्याजवळ भाजपा युवा मोर्चातर्फे निदर्शने करत चीन अध्यक्षाच्या फोटो होळी करण्यात आली. तसेच यापुढे चिनी वस्तू वापरणार नाही असा संकल्प करून, स्वदेशीचा नारा यावेळी देण्यात आला.
भाजपा युवा मोर्चा व महिला मोर्चा यांच्या माध्यमातून कोथरूड येथील व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तू आणि विदेशी वस्तू याची यादी देण्यात येणार असून, चिनी वस्तू न विकण्याची व्यापाऱ्यांना विनंती केली जाणार आहे, अशी माहिती दुष्यंत मोहोळ यांनी दिली.