तळेगाव स्टेशन/देहूरोड – राज्य सहकारी बॅंकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे गुरुवार (दि.26 )रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मावळ बंद पुकारण्यात आला होता. या बंदला मावळ परिसरातून
संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
तळेगाव स्टेशन
तळेगाव दाभाडे स्टेशन स्टेशन परिसरात मराठा क्रांती चौकात सिंडीकेट बॅंकेजवळ निषेध सभा झाली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, शहर अध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक किशोर भेगडे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश खांडगे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी मनोगत व्यक्त करुन निषेध नोंदविला.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, नगरसेवक संतोष भेगडे, पुणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष विजयराव काळोखे,मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बबनराव भोंगाडे, माजी नगरसेवक दिलीप खळदे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमशेठ ओसवाल,सरचिटणीस नंदकुमार कोतुळकर, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुलाल नालबंद, शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र दाभाडे, माजी नगरसेवक अरूण पवार, नगरसेवक अरूण माने, माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, तालुका युवक कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, तळेगाव शहर महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनिता काळोखे, उपाध्यक्षा ज्योती शिंदे, नगरसेविका वैशाली दाभाडे, माजी नगराध्यक्षा माया भेगडे आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
देहूरोडची बाजारपेठ बंद
देहूरोड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने येथील मुख्य बाजारपेठेतील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामध्ये ईडी आणि सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ईडी आणि सरकार विरोधात घोषणाबाजी देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ नेते यदुनाथ डाखोरे, प्रदेश प्रतिनिधी बाळासाहेब जाधव, शहराध्यक्ष ऍड.कृष्णा दाभोळे, ऍड प्रवीण झेंडे, महिध्यक्षा शीतल हगवणे, आदींनी निषेध नोंदवित मनोगत व्यक्त केल.
यावेळी माजी शहराध्यक्ष मिकी कोचर, माजी युवकाध्यक्ष धनराज शिंदे, किशोर जगताप, धनंजय मोरे, गोविंद राऊत, शंकर स्वामी, कैलास गोरवे, गणेश कोळी , तरलोचनसिंग रत्तू, रफीक अत्तार, शिवाजी दाभोळ, रेणू रेड्डी आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाजारपेठेतून सरकार विरोधात घोषणा देत व्यापाऱ्यांना बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गुरुवारी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत बंद पाळला.
राष्ट्रवादीच्या बंदला मावळ तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
वडगाव मावळ – शिखर बॅंकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ईडी मार्फत झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवार (दि.26) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पुकारलेल्या मावळ तालुका बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मावळ तालुक्यात वडगाव, तळेगाव दाभाडे, कामशेत, लोणावळा, वराळे, नवलाख उंब्रे आदींसह ग्रामीण भागातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चौकाचौकात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शासकीय कार्यालय, मेडीकल, हॉस्पिटल, हॉटेल, शाळा, महाविद्यालय सुरु होते. बाजारपेठा कडकडीत बंद होत्या. एरवी वर्दळीचे असलेले रस्ते व चौक निर्मनुष्य झाले होते. सायंकाळी चारनंतर बाजारपेठा सुरु झाल्या. शरद पवार हे कधीही शिखर बॅंकेच्या संचालक मंडळावर नसतानाही ईडीने जाणीवपूर्वक त्यांचे नाव या कथित घोटाळ्यामध्ये जोडले आहे, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत होते.