भारत बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे 

नगर – सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला नगर शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला. शहरातील काही भाग वगळता कडकडीत बंद पाळला गेला. सकाळी 11 वाजता जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन त्याच ठिकाणी एनआरसी, सीएए विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.

एनआरसी, सीएए हटाओ.. संविधान बचाओ… देश बचाओ…, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात हाजी शौकत तांबोली, मन्सूर शेख, राजेंद्र करंदीकर, उबेद शेख, डॉ.परवेज अशरफी, घुगे शास्त्री महाराज, राज मोहंमद नूरी, अशोक गायकवाड, अर्शद शेख, बाळासाहेब मिसाळ, मौलाना खलील नदवी, मौलाना अबुल सालेम, मतीन सय्यद, डॉ.भास्कर रणन्नवरे, सोमनाथ शिंदे, आकाश जाधव, रफीक बागवान, नईम सरदार, अल्तमाश जरीवाला, फारुक रंगरेज, अज्जू शेख, वहाब सय्यद, हमजा चुडीवाला, फिरोज शेख, अविनाश देशमुख, संजय सावंत, सुभाष गायकवाड आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी व सर्वधर्मिय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काश्‍मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे एका विषयावर सर्व धर्मीय भारतीयांनी आवाज उठवला असून, सुधारित नागरिकत्वाच्या काळ्या कायद्याच्या विरोधात हा एल्गार आहे. हिंसक पध्दतीचा अवलंब न करता, लोकशाही मार्गाने नागरिक स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी झाले असल्याचे सांगण्यात आले.

एनआरसी व सीएए कायदा रद्द करुन ईव्हीएम मशीनवर बंदी आणण्याची तर डीएनएच्या आधारावर एनआरसी लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या धरणे आंदोलनात प्रमुख वक्त्‌यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी भाजप सरकार निशाना साधून या कायद्या विरोधात निषेध नोंदवला. शहरातील माळीवाडा, पंचपीर चावडी, तख्ती दरवाजा चौक, माणिक चौक, कापड बाजार, मोची गल्ली, घासगल्ली, सर्जेपुरा, लालटाकी, मुकुंदनगर, पीरशहा खुंट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट तसेच भिंगार मधील काही भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. इतर ठिकाणी संमिश्रपणे बंदला प्रतिसाद मिळाला. या बंदला जमाते उलेमा ए हिंद, जमाते ईस्लामे हिंद, जमाते अहले हदिस, सुन्नी उलेमा कौन्सिल, भारतीय विद्यार्थी मोर्चा, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, युनायटेड रिपाई, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय आदिवासी संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.