आमदार काळेंचे संबंधित ठेकेदाराला आदेश : तलावाची केली पाहणी
कोपरगाव – कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाच नंबर साठवण तलावाचे काम चार महिन्यांत पूर्णच झाले पाहिजे, प्रसंगी खोदकाम व माती वाहतुकीसाठी वाढीव साधनसामग्री लावावीत, पण ते पूर्ण करा अशा शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित विभागासह ठेकेदाराला सुनावले.
आ. काळे यांनी पुढाकार घेवून वादग्रस्त पाच नंबर तलावाच्या कामाचा शुभारंभ केला. नवीन तलावाची निर्मिती करण्यासाठी पालिकेकडे पैशाची कमतरता असल्याने समृध्दी महामार्गाच्या ठेकेदाराच्या मदतीने पाच नंबर तलावाच्या खोदकामाला सुरूवात आ. काळे यांच्या पुढाकाराने झाली. सध्या हे काम कसे चालु आहे, किती झाले याचा आढावा घेण्यासाठी आ. काळे यांनी सोमवारी सकाळी पालिकेचे अधिकाऱ्यासह पाहणी केली.
आ. काळे म्हणाले, गेल्या पाच वर्षापासून पाच नंबर तळ्याचा प्रश्न रखडला होता. त्याचा पाठपुरावा करून जिल्हाधिकाऱ्यांकडे साठवण तलाव पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण करण्याची विनंती केली. तलावाच्या खोद कामाबरोबरच कॉंक्रीट करण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना केल्या. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी तलाव वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. या कामाचा दररोजचा तपशील आ. काळे यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे मागविला आहे.
पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे म्हणाले, येसगाव येथील गटनंबर 27 मध्ये पाच नंबर तलावाचे काम सुरू आहे. या तलावाची विशेष आकृती व कॉंक्रिटीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी संबंधित संस्थेच्या अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे विशेष प्रस्ताव पाठवून त्या आराखड्यानुसार तलावासाठी अपेक्षित निधीचा पाठपुरावा करून हे पाच नंबरचे साठवण तलाव कॉंक्रिटीकरणाने मजबूत व सर्वाधिक साठवन क्षमतेचे तलाव तयार होईल असेही ते म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, मंगेश पाटील, गटनेते विरेन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, सुनील गंगूले, नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे आदी उपस्थित होते.