खासदार व दोन माजी आमदार बसले तीन तास पोलीस ठाण्यात ठाण मांडून
जामखेड – सिनेमागृहातून भाजप कार्यकर्त्यास बंदुकीचा धाक दाखवून गाडीत बसवून साकत परिसरात पळवून नेले. तसेच त्या ठिकाणी हॉकीस्टीकने मारहाण करून त्याच्याकडील सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज लुटला. मारहाण करून लुटले तरी देखील या गंभीर घटनेचा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास उशीर होत असल्याने बीडच्या भाजप खासदार प्रितमताई मुंडे, माजीमंत्री सुरेश धस व माजी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला धाव घेऊन तब्बल तीन तास पोलीस स्टेशनला ठाण मांडून बसले होते. अखेर पोलिसांवर दबाव वाढल्याने रात्री उशिरा सहा जणांना विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टसह अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शाम अर्जुन हुले (रा. ढाळेवाडी ता. पाटोदा) हा आपल्या दोन मित्रांसह मोटारसायकलवर शुक्रवारी दि. 24 रोजी दुपारी तीनच्या सुमारास जामखेड येथील चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आला होता. चित्रपटाचा मध्यांतर झाल्यावर महादेव भिमराव खाडे (रा. करंजवण. ता. पाटोदा), ऋषिकेश गोवर्धन सानप, महेश गोवर्धन सानप, कृष्णा ज्ञानदेव बडे (तिघे. रा. सौताडा ता.पाटोदा), स्वप्निल उर्फ राणा सदाफुले, सनी उर्फ प्रिन्स सदाफुले (दोघे रा. जामखेड) व इतर अनोळखी एक असे एकूण सात जण त्या ठिकाणी आले. हुले यांना सिनेमागृहाच्या बाथरूमकडे नेले. तेथे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर सिनेमागृहाच्या बाहेर ओढत नेत रिव्हॉल्व्हर डोक्याला लावून गाडीत बसवले. साकत परिसरातील एका शेतात नेऊन तलवारीचा धाक दाखवून हॉकीस्टीकने मारहाण करून गंभीर जखमी केले. अपहरणकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हुले यांच्या खिशातील सोन्याचे ब्रासलेट लॉकेट व रोख रक्कम 18 हजार रुपये असा एकूण 2 लाख 93 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. घटनेनंतर हुले यांना त्याच ठिकाणी सोडून आरोपी चारचाकी वाहनातून पळून गेले. घाबरलेल्या अवस्थेत शाम हुले असल्याने त्याने या घटनेची फिर्याद देण्यासाठी दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दि. 25 जानेवारी रोजी जामखेड पोलीस ठाण्यात आले.
पोलिसांनी याबाबत तक्रार अर्ज घेतला, मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्ही नंतर या असे हुले या भाजपच्या कार्यकर्त्यास सांगितले. त्यानंतर हुले यांनी थेट बीडचे खासदार प्रितमताई मुंडे यांना फोन करून पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत, असे सांगितले. या घटनेचे गांभीर्य ओळखून खा.मुंडे, माजी महसूल मंत्री सुरेश अण्णा धस व माजी आमदार भीमराव धोंडे हे जामखेड पोलीस ठाण्याला आले. तब्बल तीन तास ठाण मांडून बसले. आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत. हे लक्षात आणून दिल्यावर अखेर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी अखेर आरोपींवर गुन्हा दाखल केला. या घटने प्रकरणी पोलिसांनी कृष्णा ज्ञानदेव बढे या आरोपीस अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.