नवी दिल्ली – ‘बिग बॉस 16’ फेम अर्चना गौतमने 26 फेब्रुवारी रोजी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय संदीप सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अर्चनाने फेसबुकवर लाईव्ह येऊन तिच्या चाहत्यांना सांगितले की, ‘प्रियंका गांधींचे पीए संदीप सिंग यांनी तिला ‘दो कौड़ी की औरत..’ म्हटले आहे. इतकेच नाही तर अर्चना गौतमने दावा केला आहे की, ‘संदीप सिंहने आपल्याला धमकी दिली होती, जर तू जास्त बोलली तर तुरुंगात टाकू’. असं तिने म्हंटलं होत.
दरम्यान, याप्रकरणी आता अर्चना गौतमने प्रियंका गांधी यांच्या निकटवर्तीय संदीप सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी एससी एसटी ॲक्टअंतर्गत केस दाखल केली असून, याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. संदीप सिंह यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 506 आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 (1) (डी) आणि 3 (1) अंतर्गत परतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अर्चनाने 2022 मध्ये मेरठमधील हस्तिनापूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, अर्चनाचा पराभव झाला. बिग बॉस 16 मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अर्चनाने दावा केला आहे की, ’तिला रायपूर सत्रादरम्यान प्रियंका गांधींच्या पीएने धमकी दिली होती. प्रियांका गांधींचे पीए संदीप सिंग यांच्याकडे महिलांशी बोलण्याची पद्धत नाही. एवढेच नाही तर अर्चनाने संदीप सिंह यांच्यावर संपूर्ण काँग्रेस पक्ष नाराज असल्याचेही सांगितले.
तसेच ती म्हणाली होती, संदीप सिंग हे कोणालाही प्रियंका गांधींपर्यंत पोहोचू देत नाहीत, तो सर्वकाही गुप्त ठेवतो. त्यामुळेच त्यांना प्रियंका गांधींना भेटायला जवळपास एक वर्ष लागले. मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला नाही, तर मी प्रियांका दीदी यांच्यासोबत सामील झाले आहे. त्यांच्यामुळेच मी काँग्रेसमध्ये आले आहे. मी संदीप सिंगला आव्हान देते, हिंमत असेल तर मला तुरुंगात टाकून दाखव.’ असं अर्चना आपल्या लाईव्ह मध्ये म्हणाली होती.